महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी दिल्लीत प्रयत्न करणार

0
IMG-20211101-WA0064

महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी दिल्लीत प्रयत्न करणार

सिन्नर, दि. 2 नोव्हेंबर:
महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्याच विचारांवर मार्गक्रमण करतो आहे. महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे. मात्र, आजपर्यंत हा पुरस्कार मिळू शकलेला नाही. आता माझी दिल्ली दरबारी ऊठबस वाढली आहे. त्यामुळे भारतरत्न मिळवण्यात जास्त वेळ लागणार नाही. भारतरत्नसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

सिन्नर तालुक्यातील धोंडवीरनगर येथे उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, महात्मा फुले यांचा पुतळा धोंडवीरनगरमध्ये उभारण्यात आला ही आनंदाची बाब आहे. मात्र, अशा राष्ट्रीय नेत्यांचे विचार महत्त्वाचे असून हे स्मारक त्यांच्या विचारांचे स्मारक म्हणून गावाने जपावे. पुतळ्यासह परिसराची स्वच्छता ठेवावी. पुतळ्याचे पावित्र्य जपावे. भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात आपण व्यसनमुक्तीचा नारा दिला असून देशातल्या तरुणांना व्यसनापासून रोखण्यासाठी गावाने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य क्रांतीचे तर महात्मा जोतीराव फुले हे समाजक्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *