घटनादुरुस्तीने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही

0
IMG-20211101-WA0063

घटनादुरुस्तीने आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही

सिन्नर, दि 2 नोव्हेंबर:

जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र मोजणी व्हावी या मागणीसह केंद्र सरकार घटनादुरुस्तीसह ओबीसी आरक्षण देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाची लढाई थांबणार नाही. ओबीसी आरक्षणाची लढाई पन्नास वर्षांहूनही आधीपासून सुरू आहे. १९३१ च्या जनगणनेत ओबीसींचे प्रमाण ५४ टक्के होते. त्यामुळे त्यांच्या ५० टक्के म्हणजे २७ टक्के आरक्षण देण्यात आले असे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
यांनी म्हटले आहे.

भुजबळ पुढे म्हणाले की, देशातील शेळ्या, बकऱ्या, म्हशी सरकार मोजते. मग ओबीसी माणसे का मोजत नाही असा सवाल स्व. मुंडे करायचे. ओबीसी आरक्षणाची बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तोलामोलाचा अन्य कुठलाही नेता नाही. मुंडे असते तर आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत मार्ग निघाला असता.

जनगणनेतून इंपेरीयल डाटा उभा राहिला असून सर्वोच्च न्यायालयात याबाबत लढाई सुरू आहे. भाजपसारखे पक्षही त्यात आता पुढाकार घेत आहेत. देशातील सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी पुढाकार घ्यायला हवा. केवळ राजकारणापुरते आरक्षण मर्यादित नाही तर नोकरीसह इतरही बाबतीत आपल्याला आरक्षण हवे आहे. घटना दुरुस्ती करुन हे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपला हा लढा थांबणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

माझ्या अडचणीच्या काळात धोंडवीरनगर हे गाव माझ्यामागे उभे राहिले. नाशिकमध्ये दहा-बारा लाखांचा मोर्चा निघाला. त्यात या गावांमधील लोकही सहभागी झाले. माझ्या कुटुंबामागे हे गाव उभे राहिले म्हणून या गावाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण आलो असल्याचे ना. भुजबळ म्हणाले. संकट काळात कोण आपला? कोण कामापुरता आलंय ते सर्व समजते असे म्हणत ‘वक्त दिखाई नही देता, लेकिन वक्त बहुत कुछ दिखा देता है’ आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *