फडणवीस व ड्रग्ज पेडलर जयदीप राणाचे संबंध

0
IMG_20211029_092716

फडणवीस व ड्रग्ज पेडलर जयदीप राणाचे संबंध..

मुंबई दि. १ नोव्हेंबर :
देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नी यांनी मुंबई नदी सरंक्षण अभियानातंर्गत एक गाणे तयार केले होते. यामध्ये सोनू निगम यांनी गाणे गायले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने अभिनयासहीत गाणे देखील गायले होते. देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या गाण्यात अभिनय केला होता. फडणवीस आणि मुनगंटीवार अभिनय क्षेत्रात उतरले ही चांगली गोष्ट आहे. मात्र या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. त्यामुळे जयदीप राणाला ओळखत नाही, अशी पळवाट भाजपच्या नेत्यांना घेता येणार नाही. यासोबतच नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणा यांचा गणपती दर्शन घेतानाचा आणखी एक फोटो बाहेर काढला. त्यामुळे दोघेही एकमेकांना चांगले ओळखत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.

सार्वजनिक जीवनात कुणी कुणाबरोबरही फोटो काढू शकते. मात्र फोटो काढताना ज्यापद्धतीची पोझ दिली आहे, त्यावरुन फोटोतील व्यक्ती एकमेकांना चांगले ओळखत असल्याचे दिसून येते असेही नवाब मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचा एक ‘वाझे’ मुंबईत राहतो, हे मी आधीच सांगितले होते. निलेश गुंडे नामक व्यक्तीचे माजी मुख्यमंत्र्यांसहीत घनिष्ठ संबंध होते, गुंडे याला मुख्यमंत्री निवास, मंत्रालय सर्व ठिकाणी प्रवेश होता. पोलिसांच्या बदल्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या गुंडेमार्फत होत होत्या. त्यामाध्यमातून पैसे उकळले जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच फडणवीस जेव्हा पुण्याकडे प्रस्थान करायचे तेव्हा ते गुंडे यांच्या नवी मुंबईतील घरी जाऊन भेट द्यायचे. तिथूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

भाजपचे सरकार बदलल्यानंतर सर्व केंद्रीय यंत्रणांच्या कार्यालयात हाच ‘फडणवीसांचा वाझे’ फिरताना दिसला आहे. समीर दाऊद वानखेडे हा मागच्या १४ वर्षांत याच शहरात विविध भागात काम करत आहे. त्याची बदली करण्यामध्येही फडणवीस यांचा हात आहे. निरपराध लोकांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी वानखेडे यांना आणले गेले, असा आरोपही मलिक यांनी केला.

मोठमोठे ड्रग पेडलर तसेच काशिफ खान, रिषभ सचदेवा, आमिर फर्नीचरवाला, प्रतीक गाभा यांना सोडून देण्यात आले होते. फडणवीस यांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा व्यवसाय सुरु आहे. प्रतीक गाभा हा कोण आहे? तो कुणासाठी पार्ट्या आयोजित करतो? हे सर्व येणाऱ्या दिवसात आम्ही जगजाहीर करु, असे आव्हानही नवाब मलिक यांनी दिले.

पुढील काही दिवसांत आणखी ड्रग्ज पेडलर लोकांचे फोटो आम्ही समोर आणणार आहोत, ज्यांचा भाजपशी संबंध आहे, असेही नवाब मलिक यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *