शेतकरी वंचित तरी पश्चिम विदर्भातील मंत्री गप्पच ?

0
20211014_180037

शेतकरी वंचित तरी पश्चिम विदर्भातील मंत्री गप्पच ?

मुंबई, 27 ऑक्टोबर :
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून पश्चिम विदर्भाला वगळूनही या भागातील मंत्री व सत्ताधारी आमदार गप्प का आहेत असा संतप्त सवाल भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे की, राज्यातील ४८ लाख शेतकऱ्यांकरिता चार हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय २६ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला. त्यापैकी दोन हजार आठशे साठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. दुर्दैवाने या मदतीमधून संपूर्ण पश्चिम विदर्भातील जिल्हे वगळण्यात आले आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भातील शेतकरी भीषण संकटात असून सुद्धा मदतीची घोषणा झाली नसल्याने शेतकरी वर्गात प्रचंड संताप आहे. अनेक तालुक्यांमध्ये शासनाच्या विरोधात मोर्चे निघूनही मंत्री व सत्ताधारी आमदारांनी त्याची दखल घेतली नाही. सत्ताधाऱ्यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली आहे. पश्चिम विदर्भातील सत्ताधारी मंत्री व आमदारांनी शेतकऱ्यांच्या संतापाला तोंड देण्याची तयारी ठेवावी.

पूर्व विदर्भातील गडचिरोली व नागपूर फक्त दोन जिल्हे मिळून ४ हजार शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार एकूण बाधित क्षेत्र फक्त पाच लाख दहा हजार हेक्टचर दाखविले असून एन.डी.आर.एफ च्या निकषांप्रमाणे ३५२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. या अहवालामध्ये संत्रागळ व अतिवृष्टीने बाधित आणि जमीन क्षेत्र अंतर्भूत केले नाही. मात्र अहवालाप्रमाणे अजूनही मदत जाहीर केली नाही. विभागीय आयुक्तांनी अहवाल पाठवूनही मंत्री, आमदारांचा रेटा नसल्यामुळे मदत जाहीर होऊ शकली नाही, असेही डॉ. बोंडे यांनीम्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *