आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेचा मित्र ?
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया समीर वानखेडेचा मित्र!
वानखेडे, गोसावी, प्रभाकर आणि वानखेडेचा ड्रायव्हर माने यांचा CDR काढा…
मुंबई दि. २७ ऑक्टोबर :
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि क्रुझवरील रेव्ह पार्टीतील दाढीवाला ड्रग्ज माफीया यांच्यात दोस्ताना असून त्यामुळेच त्याला कारवाईतून वगळण्यात आले आणि इतर लोकांना टार्गेट केले गेले आहे. याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीने चेक करावे. त्यात त्यांना काही सापडत नसेल तर जे वरीष्ठ अधिकारी ज्ञानेश्वरसिंग माझ्याकडे येत असतील तर ते पुरावे मी द्यायला तयार आहे, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले.
जे चौकशी अधिकारी आले आहेत त्यांनी क्रुझवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर त्यांना त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया उपस्थित होता हे दिसेल. खेळ तर झाला परंतु खेळाचा खेळाडू गाडी घेऊन का फिरत आहे याचं उत्तर एनसीबीने द्यावे. हे आज बोलत आहे त्याचे पुरावे येत्या काही दिवसात आपल्यासमोर ठेवणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
एनसीबीच्या अधिकार्याने एक पत्र माझ्याकडे पाठवले होते ते पत्र डीजी आणि एनसीबीकडे माझ्या लेटरहेडवरुन पाठवले आहे.सीबीसीच्या मार्गदर्शक सुचनेवरुन निनावी पत्राची चौकशी होत नाही परंतु ज्यापध्दतीने त्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होवू शकतो असेही नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी जी समिती आली आहे. त्यांनी पंचांना बोलावले आहे. एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्याआधारे कारवाई करते असे सांगितले जाते. प्रभाकर साहीलने संपूर्ण घटना प्रतिज्ञापत्र व व्हिडीओ करुन तो प्रसारित केला आहे. जी चौकशी समिती आली आहे त्यांनी समीर वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साहील आणि वानखेडे यांचा ड्रायव्हर माने या सर्वांचा सीडीआर काढावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
ज्या गाडीचा वापर ५० लाख रुपये नेण्यासाठी करण्यात आला ती गाडी आणि ज्यापध्दतीने सॅम डिसुझा यांच्याकडे पैसे देण्यात आले हे बघता त्यांचा जबाब घेण्याची आवश्यकता नाही कारण एनसीबी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चौकशी करते त्यामुळे सीडीआर काढल्यास सर्व सत्य समोर येईल. एवढी मोठी देशाची एजन्सी आहे. आमच्यापेक्षा चार पावले अधिक काम करत असेल तर मी ज्यांच्याकडे इशारा करत आहे त्याविषयाकडे लक्ष देतील असेही नवाब मलिक म्हणाले.
एनसीबीने एक वर्षांपूर्वी एक एफआयआर दाखल केला होता. त्यामध्ये एकालाही अटक झालेली नाही. परंतु त्या एफआयआर वरुन दिपिका पदुकोण, साराअली खान यांना बोलावण्यात आले मात्र अटक करण्यात आली नाही. हे सर्व खोटं असेल तर त्यावेळी मिडियाने दाखवलेले फुटेज बघावे आणि त्या खोलात जाऊन चौकशी करा. मालदीव दौर्याकडे लक्ष द्या. त्यावेळी मालदीवमध्ये कोण कोण अभिनेता आणि अभिनेत्री होते हा सगळा खेळ समोर येईल असेही नवाब मलिक यांनी चौकशी समितीला माध्यमातून सांगितले आहे.
क्रुझवरील पार्टी ही फॅशन टिव्हीने आयोजित केली होती. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय आणि कोविड नियमांचे पालन न करता थेट सिपिंग डायरेक्टरची परवानगी घेऊन करण्यात आली होती. त्या जहाजावर टार्गेट करून काही लोकांचे फोटो घेऊन ट्रॅक करण्यात आले. त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होता. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती ती हातात खतरनाक रिव्हॉल्व्हर घेऊन उपस्थित होती. तिथल्या रेव्ह पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे तो दाढीवाला कोण आहे हे एनसीबीच्या अधिकार्यांना माहीत आहे असा गौप्यस्फोटही नवाब मलिक यांनी आज केला.
