‘त्या’ मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे!
‘त्या’ मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे!
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर :
ज्याचा जावई गंजडी म्हणून पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्याच्या वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्यांमधून वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे असे प्रत्युत्तर भाजपा नेते आ. आशिष शेलार यांनी दिले आहे
शेलार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. ‘काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ असा काही नारा आहे का? स्वत: काही काम करायचे नाही. यंत्रणांना काम करु द्यायचे नाही. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाही, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही… हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही.
