20211022_205016

पुन्हा गजबजणार आठवडे बाजार !

पुणे दि.२२ ऑक्टोबर :
जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदशक सूचनांचे पालन करून आठवडे बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

आठवडे बाजारासाठी परिसरातील गावातून नागरिक येतात. त्यापैकी काहींना माहिती नसल्याने त्यांनी लस न घेतली असल्याची शक्यता असते. त्यांच्या लसीकरणासाठी बाजार परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.अशा शिबिरांच्या आयोजनांची माहिती नागरिकांना देण्यात यावी. कोविड उपचारासाठीच्या देयकांचे लेखा परीक्षण केल्यानंतर कमी केलेल्या देयकाबाबत रुग्णांना माहिती देण्याची व्यवस्था करावी अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी केली.

जिल्ह्याने लसीकरणात चांगली कामगिरी केल्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, जिल्हा परिषद तसेच महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सिरम इन्स्टिट्यूट यांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याने १ कोटी १७ लक्ष लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. लशीची पहिली मात्रा अद्यापही न घेणाऱ्या आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरणातील गती अशीच कायम ठेवावी. लसीकरण कमी असलेल्या भागात विशेष शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील संसर्ग अधिक असणाऱ्या भागावर विशेष लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिर उपक्रमाचा चांगला फायदा झाल्याचेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *