शिक्षकांच्या ‘जुनी पेन्शन’करिता पाठपुरावा करु
शिक्षकांच्या ‘जुनी पेन्शन’करिता पाठपुरावा करु
अकोला, दि.17
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू व्हावी ही रास्त मागणी असून शिक्षकांना पेन्शन लागू व्हावी याकरीता शासनस्तरावर पाठपुरावा करु, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेची आढावा बैठक कडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुचित्रा पाटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैधाली ढग, विठ्ठल पवार, श्रीराम पालकर, कल्पना राऊत व शिक्षक संघर्ष समितीचे सदस्य व शिक्षक उपस्थित होते.
राज्य शासनाने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. पेन्शन मिळणे हे अधिकारच असून कर्मचारी व शिक्षक संघटनेची जुनी पेन्शन लागू व्हावी ही मागणी शासनस्तरावर पाठपुरावा करु. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावू, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी दिली.
