सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही!
सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही!
नागपूर, दि. १६ ऑक्टोबर
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्लाबोल केला. त्यांच्या आरोपांना भाजपा नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले. सरकार पाडून दाखवा असे उद्धव ठाकरे आव्हान देत आहेत पण ज्यादिवशी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा. ज्या महाराष्ट्र सरकारचे नेतृत्व तुम्ही करत आहात ते इतिहासातील सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे अशी इतिसाहात नक्की नोंद होईल. तुमचा एकच अजेंडा, फक्त खंडणी.
एकेकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात विचारांचं सोनं लुटलं जायचं पण कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी गरळ ओकली. उद्धव ठाकरेंनी आता भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. आता त्यांनी मान्य करायला हवे की मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षी होती. बाळासाहेबांना दिलेला शब्दच पाळायला होता तर मग दिवाकर रावते एकनाश शिंदे, सुभाष देसाई यांना मुख्यमंत्री पदी बसवता आले असते, तुम्ही त्यांना मुख्यमंत्री का केले नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला.
विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करण्याला पंतप्रधान मोदींचा विरोध आहे. ते या सगळ्यात कधी लक्षही घालत नाहीत. भाजप हा लोकशाहीच्या मार्गाने चालणारा पक्ष आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला तसा भाजप करणार नाही. मात्र, पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय गप्पही बसणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांनी भीती बाळगावी, ज्यांनी नसेल केला त्यांनी निश्चिंत राहावे, असे फडणवीस म्हणाले.
