IMG_20211015_231014

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचे हिशोब चुकते केले

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा !

मुंबई, दि 15 ऑक्टोबर:
उद्धव ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे दसरा मेळाव्यात सगळे हिशोब चुकते केले. भारतीय जनता पक्ष व केंद्र सरकार वर त्यांनी जबरदस्त हल्ले चढवले. केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया, महाराष्ट्राबरोबर केंद्र सरकारचा असे एक हल्ले करत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यास व भाजपाशी दोन हात करण्यास तयार असल्याचे त्यांनी आजच्या भाषणातून दाखवून दिले.

आपल्या दमदार भाषणाच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले, आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही… सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी ..”जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो” अशी हाक देता आली !

तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यांत महाविकास आघाडी सरकार दोन वर्षे पूर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा, तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा, ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत.. असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केला.

मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इश्वरचरणी प्रार्थना आहे !

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरातचा निधी साडे तीनशे टक्क्यांनी वाढला, हे कॅगचे ताशेरे आहे, तिकडे कुणाची ढुंकून बघायची हिंमत नाही !

जणू काही संपूर्ण जगात माझ्या महाराष्ट्रातच गांजाचं व्यसन जास्त चाललं आहे असं चित्र दाखवलं जातंय, का असा नतद्रष्टपणा करताय? मुंद्रा अदानी बंदराचा तपास करा असं कोर्टाने सांगितलं आहे ! चीन मधून बऱ्याचशा कंपन्या बाहेर पडतायत, त्यांना  महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि हे मराहाष्ट्राला बदनाम करतायत, कुठे फेडणार ही पाप?

सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे.? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका.पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर हे मेळावेतरी कशाला ? त्यावेळी मोहन भागवत म्हणाले झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाहीत.मग हे हिंदुत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं? कुणाला शिकवायचं? आणि कोणाकडून शिकायचं? हिंदुत्वाला धोका नाही हे सत्य असेल तर हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता!

वाईट काळात शिवसैनिक चालत होता. आता मात्र चालत नाही. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. ते पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा ! तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही. देव, देश आणि धर्मासाठी जन्म झाला आहे. तो शिवसैनिक तुम्ही भ्रष्ट ठरवत आहात? का तर तुमच्या पालख्या वाहत नाही म्हणून?

हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण दाखवायची वेळ आली तर दाखवावीच लागेल ! ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू !

‘त्यांनी’ शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं तर ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे मुख्यमंत्री झाले असते. पण ते त्यांच्या नशिबातच नाही !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *