लखीमपूर घटनेची तुलना ‘जालीयनवाला बाग’शी केल्यामुळे आयकर छापे !
लखीमपूर घटनेची तुलना ‘जालीयनवाला बाग’शी केल्यामुळे आयकर छापे !
मुंबई, दि. 13 ऑक्टोबर:
उत्तर प्रदेशातील लखीमपूर प्रकरणाची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली म्हणून पवारांच्या नातेवाईकांवर केंद्रीय यंत्रणा कारवाई करत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार यांनी आरोप केला आहे.
या कारवायांवर पवार पुढे म्हणाले की, लखीमपूर घटनेवर जालीयनवाला बाग असा शब्द मी वापरला. दोन – तीन भाजप मंत्र्यांना वाईट वाटल, त्यांचे फोन आले हे शब्द चांगले वापरले नाहीत. त्यानंतर हे पाहुणे घरी आले.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेची माहिती बाहेर आली.सुदैवाने त्याचे व्हिडिओही समोर आले. शांतपणे चाललेल्या शेतकऱ्यांना काही लोक गाडीची धडक देतात, त्यातून हिंसा भडकून तीन-चार लोकांची दुर्दैवाने हत्या झाली. असा प्रकार दुर्दैवाने कधी घडला नव्हता. ही घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा चिरंजीव त्याठिकाणी उपस्थित होता. उत्तरप्रदेश सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला. सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीवर जरी आरोप असला तरी सत्ताधारी पक्षाने यात काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेणे, अपराध्यावर कारवाईची उपाययोजना न करणे ही जबाबदारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी देखील पदावर राहता कामा नये, त्यांनी तात्काळ पदावरुन दूर व्हायला हवे अशी मागणीही शरद पवार यांनी केली.
लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मावळच्या घटनेचा उल्लेख केला गेला. मावळ येथे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राज्यकर्ते नाही तर पोलीस जबाबदार होते. त्या घटनेलाही बराच काळ उलटून गेला आहे. तरीही माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा उल्लेख केला. मावळचे चित्र आज बदलले आहे. ज्यांच्यावर त्यावेळी मावळवासियांनी आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे लक्षात आले. उलट भाजपच्या काही नेत्यांनी भडकावल्यामुळे त्याकाळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मावळ तालुक्यात जनसंघ आणि नंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी हे मावळचे लोकप्रतिनिधी होते. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरं केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तन करायचे असेल तर जो भाजप विरोधी पक्ष तिथे सर्वात ताकदवान आहे, त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, अशी आमची भूमिका आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना आम्ही समर्थन देत आहोत. आम्हाला जागा कमी मिळाल्या तरी भाजपच्या पराभवात खोडा न घालण्याची आमची भूमिका आहे असेही शरद पवार यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली.
