महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ !
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ !
मुंबई, दि. 13 ऑक्टोबर :
किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागणाऱ्या महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, तुरुंग प्रशासन यांच्यासमवेत अशा महिलांच्या कायदेशीर सहकार्याकरिता राज्य महिला आयोगाचा सहभाग घेवून ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे, तसेच त्यांना विधीसेवेचे सहकार्य देऊन मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री ॲड. ठाकूर बोलत होत्या.
ठाकूर पुढे म्हणाल्या की, विधीसेवा न मिळाल्याने कारागृहात असलेल्या महिलांना विधीसेवेचे सहकार्य देण्याकरिता सुरुवातीला महाराष्ट्रातील महिला कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे व त्यांच्या गरजेनुसार विधीसेवा सहकार्य व समुपदेशन देणे. त्यांना आवश्यक असल्यास पुनर्वसनकरिता मदत करणे या पद्धतीचे काम विभागाच्या माध्यमातून करता यावे याकरिता मिशन मुक्ता कार्यरत असेल. यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनकरिता काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग असेल.
