कोकणची संपन्नता जगासमोर येणार

0
20211010_125428

कोकणची संपन्नता जगासमोर येणार

सिंधुदुर्ग, दि. 10 ऑक्टोबर:
सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली, सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासूनचे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद झाला आहे. या विमानतळामुळे जगभरच्या पर्यटकांबरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल.कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांना, आंबा, काजू, फणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल. या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय  होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. येथे विमान बरोबरच हेलिकॉप्टर सेवा ही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *