शरद पवारांच्या नावाने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशिप’

0
IMG_20211009_090815

शरद पवारांच्या नावाने ‘शरद पवार इनस्पायर फेलोशिप’

फेलोशिपद्वारे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्याला सलाम

मुंबई दि. 9 ऑक्टोबर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी येणारा वाढदिवस यावर्षी पासून अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार असून त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणार्‍या होतकरू तरुण तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना शरद पवार इनस्पायर फेलोशिप दिल्या जाणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

शरद पवार गेली ६० वर्षाहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आजही जनतेला फायदा होत आहे. याशिवाय औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण इत्यादी अशा विविध क्षेत्रात पवार साहेबांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.

पवार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रांचा वसा कायम ठेवला. पवारसाहेबांच्या नावाने फेलोशिप जाहीर करताना आनंद होत असून याचा विकासाची जाण असणार्‍या आणि समाजासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची धमक असणाऱ्या तरुण तरुणींना नक्कीच फायदा होईल असे खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान च्यावतीने शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर, शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप (शरदचंद्र पवार साहित्य पाठयवृत्ती) आणि शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन या तीन फेलोशिप दिल्या जाणार आहेत. यापैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशिप चा कार्यक्रम ८ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार असून निवडलेल्या फेलोची घोषणा १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना ती फेलोशिप सन्मानपूर्वक दिली जाणार आहे.

शेती क्षेत्रासाठी फेलोशिपसाठी महाराष्ट्रातील जिज्ञासू विषयातील रुची आणि परिणामकारक नेतृत्व गुण या निकषावर या तरुण तरुणींची तज्ज्ञांच्या कमिटी द्वारे निवड करण्यात येईल. यासाठी राज्य भरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यातून शार्टलिस्ट केलेल्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांची कमिटी त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील ८० जणांची फेलोशिपसाठी निवड केली जाणार आहे. या फेलोंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ व अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहामध्ये दमदार लेखन करणार्‍या प्रयोगशील लेखक लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शरदचंद्रजी पवार साहित्य पाठयवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून शार्टलिस्ट झालेल्या तरुण तरुणींच्या मुलाखती घेऊन त्यातून दहा जणांना ही फेलोशिप जाहीर करण्यात येणार आहे. या फेलोंना साहित्य निर्मितीसाठी नामवंत साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी मदत देखील करण्यात येणार आहे.

शिक्षणक्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांसाठी शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनचा कार्यक्रम डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काहीतरी नवे करु इच्छिणार्‍या प्रयोगशील तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधी असून या फेलोशिपसाठी जास्तीत जास्त तरुणतरुणींनी अर्ज सादर करावेत असे आवाहन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

एमकेसीएल फौंडेशन बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे फेलोशिप उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनचे मुख्य समन्वयक म्हणून विवेक सावंत हे काम पाहणार आहेत.

यावेळी फेलोशिप सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, विश्वस्त बी. के. अग्रवाल, शरद पवार इनस्पायर लिटररी फेलोशिपचे मुख्य समन्वयक प्रा. नितीन शिंदे, शरद पवार इन ॲग्रीकल्चरचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश नलावडे हे झूमद्वारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *