नाशिक मुंबई महामार्गासाठी पाच हजार कोटी रुपये मंजुर

0
20211006_115656

नाशिक मुंबई महामार्गासाठी पाच हजार कोटी रुपये मंजुर

नाशिक दि. 6 ऑक्टोबर :
नाशिक ते मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसह त्याच्या नूतनीकरणासाठी पाच हजार कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. पिंपरीसदो ते गोंदे या 20 किमी मार्गाचे सहा पदरीकरण व नाशिकरोड ते द्वारका ईलिव्हेटेड कॉरिडॉर ही करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

नाशिक येथील एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आलेली आहेत. नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण देशात वाढणार आहे.सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर ते चेन्नई पर्यंतच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला भारतमाला परियोजना फेज-1अंतर्गत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

सूरत ते चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला भारतमाला परियोजना फेज-1 अंतर्गत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. प्रकल्पाच्या विस्तार अहवाल (DPR) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असुन डी.पी.आर. तयार करण्यााचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पामुळे सुरत ते सोलापुर मधील एकूण 515 कि.मी. लांबीपैकी सुमारे 122 किलोमीटर लांबी नाशिक जिल्ह्यातून जात आहे. नाशिक जिल्‍ह्यात एकूण 980 हेक्टर जमीन ग्रीनफील्ड एक्सप्रेससाठी संपादित करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पाची किंमत अंदाजे 11000 कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग (Access Control) असुन प्रकल्प पूर्ण झाल्यांनतर सुरत ते सोलापूर दरम्यान 95 किलोमीटरचे अंतर कमी होईल आणि सुरत ते चेन्नई प्रवास करण्यासाठी सुमारे 200 किमीचे अंतर कमी होईल. नाशिक ते सुरत अंतर अवघ्या दिड तासात कापता येईल. नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही लवकरच सुरु करण्यात येत आहे.  हा प्रकल्प 3 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असुन प्रवासाचा कालावधी देखील कमी होणार आहे. तसेच ग्रामीण भागातुन एक्सप्रसवे जात असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई, पुणे, सोलापुर या मुख्य शहरामधील वाहतुकीवर येणारा ताण व त्यामुळे होणारे अपघात, प्रदुषण यांना पायबंद बसणार आहे. नाशिक परिसरातील भाजीपाला, नाशिवंत शेतीमालाला सुरतची मोठी बाजार पेठ लाभेल. सुरत-नाशिक हा पेठ आणि सुरगाणा तालुक्यात जात असून तेथे इको टुरिझमला प्रचंड वाव आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *