मुलांशी भावनिक संवाद साधणार !

0
IMG_20211004_180636

मुलांशी भावनिक संवाद साधणार

मुंबई, दि. 4 ऑक्टोबर:

आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती  शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविडची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही.

आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थीनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मूलभूत कौशल्य व अध्ययन निष्पतीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेतर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

मार्च २०२० पासून कोविड-१९ ची संसर्गता लक्षात आल्याने लॉक डाऊनमुळे शाळा तडकाफडकी बंद कराव्या लागल्यात. पण आपला शिक्षण विभाग मात्र विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून निरंतर कार्यरत राहिला आहे. याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी मागील १८ महिन्यात ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने अत्यंत परिणामकारक उपक्रम राबवले आहेत. रेडिओ, दूरदर्शन, व्हॉटसअप, युटुयब, फेसबुक, गुगल क्लासरूम या सर्व माध्यमाचा प्रभावी वापर करीत मुलांना त्यांच्या इयात्तानुरूप शिकत ठेवले आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *