मोदी सरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही

0
IMG-20211002-WA0060

मोदी सरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही

नाशिक दि. २ ऑक्टोबर :
देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदी सरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही.आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. आणि त्या निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणू त्यावेळी ही लढाई संपेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळसाहेबांनी अभ्यास करून मंत्रीमंडळात मांडणी केली आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. इम्पिरिकल डेटाची मागणी करुनही केंद्रसरकार टाळाटाळ करत आहे यावरुन हे सरकार ओबीसीविरोधात किती आहे हे लक्षात येते असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

ईडीचा गैरवापर करण्यात आला त्याचं उदाहरण भुजबळसाहेब आहेत. भुजबळसाहेबांना महाराष्ट्र सदन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका कळावी यादृष्टीने ही परिवार संवाद यात्रा असल्याची माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली.

पक्षाची प्रगती करायची असेल तर २८८ मतदार संघापर्यंत गेले पाहिजे. या मतदारसंघात निवडणूक लढवली की नाही यापेक्षा कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे माझं काम आहे . बर्‍याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी मौलिक सूचना केल्या आहेत. त्याचा विचार पक्ष नक्की करेल. सरकारची कर्जमाफी व भुजबळसाहेबांची शिवभोजन थाळी लोकप्रिय झाली आहे. गरीबातील गरीब माणसाचे किती आकर्षण या योजनेकडे आहे हे लक्षात येते. सरकारने ज्या योजना केल्या आहेत त्या तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *