मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत द्या
मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत द्या
मुंबई, दि. 29 सप्टेंबर:
राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्यांना तत्काळ मदत दिली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले की,निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही.
अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे.
कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, असे फडणवीस म्हणाले.
