पूरग्रस्त भागातील 100 लोकांची हेलिकॉप्टर व बोटीने सुटका
पूरग्रस्त भागातील 100 लोकांची हेलिकॉप्टर व बोटीने सुटका.
मुंबई, दि. 29 सप्टेंबर:
मराठवाड्यात अतिवृष्टीने अडकलेल्या 100 पेक्षा जास्त लोकांना हेलिकॉप्टर व बोट्टीच्या माध्यमातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागातील या लोकांना वाचविले याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.
उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टरने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतमाळ आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले आहे. एनडीआरएफचे १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने शिराढोण 171 मिमी, गोविंदपुर 107 मिमी, ढोकी जाकची आणि तेर येथे जवळपास 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये दोन मोठ्या नद्या असून मांजरा नदीवरील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून साधारणतः 706 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या खालील वाकी व वाक्केवाडी गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व गावातील नागरिक अडकले होते. सदर नागरिकांना स्थानिक बचाव पथकांच्या माध्यमातून बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपुर गावातील सहा व्यक्ती तेरणा नदीच्या पाण्यामुळे वेढले गेल्याने ते उंच भागात टेकडीवर आसरा घेऊन थांबले आहेत. यांच्या बचावासाठी भारतीय हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरपरिस्थितीदरम्यान मदत व बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम तैनात करण्यात आली आहे.
तालुका सौंदनाआंबा गाव कळंब येथे दहा जणांना व उस्मानाबाद गाव दाऊतपुर येथे सहा जणांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील पोहरेगाव तालुका रेनापुर येथे अडकलेल्या तीन व्यक्तींच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पूरपरिस्थिती दरम्यान मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफची एक टीम देखील तैनात करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील निर्माण पूरपरिस्थितीमध्ये स्थानिक बचाव पथकाने आतापर्यंत 24 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले असून अतिरिक्त मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक रवाना केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरून पाणी असताना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने पुलावरून नेली असता गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. बसमध्ये चार ते सहा प्रवासी असल्याची माहिती प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून एक व्यक्ती झाडावर चढला होता व एक व्यक्ती एसटीच्या टपावर चढला होता त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.
