मुंबईतील 927 खड्डे बुजवायला 48 कोटी रुपये ?
मुंबईतील 927 खड्डे बुजवायला 48 कोटी रुपये ?
मुंबई, दि. 27 सप्टेंबर :
मुंबईतील सुमारे 2 हजार किमीच्या रस्त्यावर केवळ 927 खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे 48 कोटींंची तरतूद केली ती याच 927 खड्यांसाठी का? असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबईतील खड्डे हा विषय सध्या गाजत असून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी या विषयावर भाष्य करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निषाणा साधला. मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले त्यावर केवळ 927 खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. महापालिका दररोज नवी हसवणूकीची स्पर्धाच करते आहे असे चित्र आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला मग तो या 927 खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आमदार आशिष शेलार यांनी केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी सुरु आहे चौकशीत सत्य समोर येईलच.
मुंबईच्या महापौरांना आमचा सवाल आहे की, पूर्ण मुंबईचे, संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का ? याचं कारण नवीन फूटपाथ करायचा विषय आला की फक्त वरळी..सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी.. मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते.. आता थ्रीडी मॅपिंग करायचे आहे तर ते पण वरळीत.. कोविड सेंटर बनवायचे असेल तर तेही वरळीत.. आणि पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर… वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही? असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.
