सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता साहित्य संमेलन होणे गरजेचे
सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता साहित्य संमेलन होणे गरजेचे
औरंगाबाद, दि 27 सप्टेंबर :
समाजमनाला एकत्र आणण्याचे काम हे वारकरी संप्रदायाच्या चळवळीतून झाले असून ही संत वाङ्मय परंपरा मराठवाड्याने जोपासली आहे. समाज मनाला कोणत्या प्रागतिक विचारांची गरज आहे हे साहित्यकांनी ओळखून वाचन संस्कृती जोपासण्यात साहित्यकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, के.एस.अतकरे, साहित्यिक दादा गोरे, उपाध्यक्ष किरण सगर यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
आज व्हॉटसॲपच्या जमान्यात वाचन, लेखन संस्कृती ही हरवत चालली आहे. मराठवाड्याला बंडखोर साहित्य, विद्रोही साहित्य, दलित साहित्य आदी साहित्याच्या माध्यमातून गंगाधर पानतावणे, नामदेव ढसाळ, यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकांची परंपरा मराठवाड्याला लाभली असून या परंपरेला जोपासण्याची जबाबदारी ही साहित्यिकांवरच असल्याचे सांगून आव्हाड म्हणाले की, उर्दु साहित्यावर देखील विपुल लेखन मराठवाड्यात झाले आहे त्यात बशर नवाज यांना विसरुन चालणार नाही. सर्व समुदायाच्या भाषेचे मिश्रण हे उर्दुत पहावयास मिळते आणि त्यामुळेच मराठवाड्याला विशेष महत्त्व आहे. प्रागतिक विचार म्हणजे विचाराची देवाण-घेवाण म्हणजे लोकशाहीचा सन्मान होय आणि म्हणूनच समाज प्रबोधनाकरीता सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता साहित्य संमेलन होणे गरजेचे असून लोकवर्गणीतून मराठवाडा साहित्य संमेलन झाले याचे विशेष कौतुक आहे. ज्यापद्धतीने गेले दोन दिवस येथे दर्जेदार कार्यक्रम झाले. त्यात आजची उपस्थितांची संख्या ही या संमेलानाचे यशस्वीता दर्शवते, असे गौरवोद्गार आव्हाड यांनी संमेलानाच्या समारोप प्रसंगी काढले.
कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की अतिशय बिकट परिस्थितीत मराठवाड्याने निजामराजवटीमध्ये मराठी भाषा जपली आणि यांची जाणिव तत्कालीन मुख्यमंत्री यशतंराव चव्हाण यांना होती आणि म्हणूनच त्यांनी मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे स्थापनेकरिता 1960 मध्ये शासनाच्या वतीने 10 हजार रु. इतके अनुदान सर्व साहित्य मंडळाकरिता चालु केले त्याचबरोबरच मराठवाडा विद्यापीठाची स्थापना देखील केली मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असून गेल्या काही वर्षात थांबलेला निधी मिळावा अशी माफक अपेक्षा ठाले यांनी समारोपीय भाषणात केली.
