20200728_121429

मुंबई, दि. 28 जुलै 2020

सर्व सामान्यांच्या घराचं स्वप्न साकारणारी सिडको आता हिल स्टेशन उभारणार आहे.खारघर टेकड्यांच्या शांत, सुंदर आणि निसर्गसंपदेने नटलेल्या या नयनरम्य परिसरात सिडकोतर्फे खारघर हेवन हिल्स प्रकल्प साकारण्यात येत आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या खारघर टेकड्यांवर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात निवासी व्हिला, रिसॉर्ट, नेचरोपॅथी सेंटर यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

सिडकोतर्फे खारघर हिलच्या माथ्यावरील २५० एकरवर ‘खारघर हेवन हिल्स’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पा बद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी  इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्या जवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरील खारघर हेवन हिल्स हे देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल स्टेशन राहील.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मिनी हिलस्टेशन परिसरात एक उच्चभ्रू वसाहत विकसित करण्यात येणार आहे. याचबरोबर येथील विस्तीर्ण परिसरावर नेचरोपॅथी सेंटर उभारले जाणार आहे. याखेरीज शहरातील गजबजाटापासून शांततेचे व मनोरंजनाचे दोन क्षण आपल्या कुटुंबियांसमवेत व्यतीत करता यावेत यासाठी या निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टदेखील विकसित केले जाणार आहे.

याचबरोबर सुमारे 250 एकर्सपैकी 39% एवढी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. यातून पर्यावरणाचा पूर्ण समतोल राखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

खारघर हेवन हिल प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमनातळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. यामुळे देशी व परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी हा हेवन हिल प्रकल्प आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे.

याचबरोबर हा प्रकल्प खारघर रेल्वे स्थानकापासून 3.08 कि.मी. अंतरावर आहे. मुख्य शहरांना जोडणारे रस्त्यांचे जाळेदेखील विकसित करण्यात आले आहे. सर्वच प्रकारे उत्तम कनेक्टिविटी असलेला हा प्रकल्प म्हणजे निसर्ग आणि शहरीकरण यांचा सुवर्ण संगम आहे.

त्याचबरोबर 350 एकरच्या विस्तीर्ण परिसरात सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट पार्क विकसित करण्यात येत आहे. या कॉर्पोरेट पार्कमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम व फुटबॉलसाठी विशेष प्राविण्य केंद्र उभारण्याचा सिडकोचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *