20200727_213551

मुंबई, दि.27 जुलै  2020

सध्या पुन्हा काही दिवस अकलूजच्या शेतात दिवस घालवत आहे. इथं सर्वात भारी विरंगुळा म्हणजे वाचन..! गेल्या काही दिवसात ‘Modi Effect’ हे Lance Price जो की लंडन येथील लेखक व पत्रकार यांचे पुस्तक, तसेच विनय सितापती यांचे माझी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या जीवनावरील ‘Half Lion’ हे पुस्तक अन् नामवंत लेखक चंद्रकांत वानखडे यांचे ‘गांधी का मरत नाही’ अशी काही सामाजिक व राजकारणाभोवती फिरणारी पुस्तकं वाचली. सगळीच पुस्तकं मला वेगळी नजर देत आहेत.

यात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचं पुस्तक म्हणजे पत्रकार सुधीर सूर्यवंशी लिखित ‘Checkmate: How The BJP Won & Lost Maharashtra’ हे ही एका बैठकीत वाचून पूर्ण केलं. माझे मित्र सुधीर यांनी २०१९ विधानसभा निवडणूका अन् सत्ता स्थापना काळात झालेल्या गोष्टींची सखोल माहिती खूप कष्टाने मिळवली अन् पुस्तकरुपात शब्दबद्ध केली आहे. १९६० ला झालेली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती, गुजराती – मराठी वाद, राज्यातील राजकीय पक्षांचा उदय, भाषा – संस्कृती जपण्याची लढाई ते राज्यातील बदल, विविध डाव अन् इतिहास याचा आढावा घेत घेत २०१९ विधानसभा निवडणूकांपर्यंत इत्तंभूत माहिती व भविष्यातील राजकारणचा वेध या पुस्तकात वाचायला मिळतो.

मुळातच लोकशाहीमध्ये ‘चेकमेट’ सारख्या पुस्तकांचे स्वागतच झालं पाहिजे. सामान्य लोकांना यातून राजकारणातील वास्तव कळेल. गेल्या काही वर्षात भारतीय लोकशाहीचा वाईट काळ सुरु आहे असं म्हणायला हरकत नाही. दडपशाही – हुकूमशाहीचं प्रतिक म्हणजे मोदी सरकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २०१४ व २०१९ या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासारख्या निवडणूका झाल्या. केंद्रात प्रश्न विचारायला विरोधी पक्ष नेता देखील नाही. तसंच ही राज्यात दबाव होता. आश्चर्य म्हणजे ज्या काही कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही मोेठ्या नेत्यांनी इतके वर्ष सत्ता भोगल्यानंतर सरळ भाजपात प्रवेश केला. भाजपने चुकीच्या पद्धतीने ED, Income Tax, Police, CBI, CID, Judiciary अशा विविध संस्थांचा दबाव टाकण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला. हा सगळा खटाटोप सत्तेत येण्यासाठी अन् सत्तेत राहण्यासाठी केलेला.

लेखक सुधीर यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या बऱ्याच गुपीत रहस्यांचा उलगडा तर केलाच आहे शिवाय त्यांच्या unfair politics बद्दलही लिहिले आहे. तसं पाहायला गेलं तर आता कुठल्याच पक्षात विचारांचे पाईक राहिलेले दिसत नाही हे दुर्दैव आहे. आता विचारांची लढाई किंवा शेतकरी – कामगारांच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष नसून तो सामाजिक मान-सन्मान-प्रतिष्ठा व नुसता सत्तेचा व पैशांचा खेळ आहे. खरंच लेखक सुधीर सूर्यवंशी यांचे ‘चेकमेट’ हे पुस्तक लिहिण्यासाठी आभार व धन्यवाद. त्यांचे कौशल्य लेखनातून दिसतेच म्हणून कौतुकही करावे वाटते. हे पुस्तक चांगलं-वाईट राजकारणाची व्याख्या सांगणारं आहे अन् लवकरच ते मराठीत ही उपलब्ध होणार आहे.

माझ्या मनात एक प्रश्न राहतो: आपण लोकशाही टिकवण्यासाठी व चांगल्या सरकारसाठी मतदान तर करतोय पण त्या बदल्यात सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय मिळतंय? आपल्याला चांगला लोकशाही मानणारा समाज पाहिजे. स्वच्छ व योग्य निवडणूका, तसंच स्वच्छ न्याय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. राज्य व केंद्राचा हेतू हा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आरोग्य, निवारा, शैक्षणिक, तंत्रज्ञान इत्यादी बाबींचा विकास सर्वांना सामावून घेऊन झाला पाहिजे. आणि हो शेवटी मात्र एक आहेच: Change in Power is Beauty of Democracy!

प्रविण गायकवाड
प्रदेशाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *