फिरत्या दवाखान्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा
फिरत्या दवाखान्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
चंद्रपुर, दि. 18 सप्टेंबर:
आयसीआयसीआय बँक फाउंडेशन व मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी तीन फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी केले आहे .
ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज मोबाइल क्लिनीक व्हॅनचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, नगराध्यक्षा रीता उराडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते.
फिरते दवाखाने हे गावागावात जावून नागरिकांची तपासणी करणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, डेंगू, मलेरिया आदी संसर्गजन्य आजारांची चाचणी करून मोफत औषधोपचार केला जाईल. जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा नेमुन दिलेल्या वेळेत उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सदर उपक्रमासाठी समन्वयक म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयातील कौस्तुभ बुटाला हे जबाबदारी पार पाडत असून, आयसीआयसीआय बँकेच्या गव्हर्नमेंट ॲण्ड इन्स्टीट्यूट बिझनेसचे सौरभ सिंग, वेस्टर्न झोनचे आशिषकुमार रंजन, विवेक बल्की यांच्या प्रयत्नामुळे ही सेवा उपलब्ध होत आहे. या व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर राहणार आहे. या फिरत्या दवाखान्यांमध्ये सहा प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार असून कोरोनाची चाचणीही केली जाणार आहे. या दवाखान्यांमध्ये प्राथमिक आरोग्यासाठी 20 प्रकारची औषधी उपलब्ध आहे. ग्रामस्थांच्या तपासणीनंतर तीन दिवसापर्यंतची औषधी मोफत दिली जाणार आहे.
या सिस्टीममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्याचा तपशिल, व्हॅन कुठे जाते, किती किलोमीटर फिरते याचाही तपशिल राहणार आहे. शिवाय डॉक्टर-पेशन्ट ॲप हे देखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप यात आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाइलवर जाईल. त्यावरून डॉक्टरांकडून औषधींचा तपशिल मोबाइलवरच पाठविला जाणार आहे.
