पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांचा राजीनामा

0
IMG_20210918_185252

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांचा राजीनामा

अमृतसर, दि. १८ सप्टेंबर
पंजाब काँग्रेसमधील वादामुळे अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. अमरिंदर सिंग यांना बदलण्याबाबत मागील तीन चार महिन्यांपासून काँग्रेस पक्षातून हालचाली सुरु होत्या. हायकमांडनेही नेतृत्वबदलाची भूमिका घेतल्याने अमरिंदर सिंग यांनी अखेर राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले, मी सकाळी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो होतो. त्यांना सांगितल की मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा हे होतंय. तीन वेळा त्यांनी आमदारांना दिल्लीत बोलवून मीटिंग केली. मला वाटतं की माझ्यावर त्यांना संशय आहे की मी सरकार चालवू शकलो नाही. मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय. आपल्यानंतर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हव्या त्या व्यक्तीला मुख्यमंत्री करावं, दोन महिन्यांत तीन वेळा तुम्ही आमदारांना दिल्लीला बोलवलं. त्यामुळे मी राजीनाम्याचा निर्णय घेतला. आता ज्यांच्यावर त्यांना विश्वास असेल, त्यांना मुख्यमंत्री करतील असे स्पष्ट करतानाच आपल्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत असेही ते म्हणाले.

पंजाबमध्ये सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर त्यांच्याकडून आग्रही भूमिका घेतली गेल्याची आणि राजीनामा देणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, अखेर संध्याकाळी ४ वाजता अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जाऊन आपला राजीनामा सादर केला आहे.

राजीनामा देण्यापूर्वी अमरिंदरसिंह यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसोबत बैठक घेतली. चंढिगड येथील त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यानंतर अमरिंदर सिंह यांनी राज्यपालांकडे आपल्या राजीनामा सुपूर्द केला. पंजाबमध्ये आज होणारी आमदारांची बैठक ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी अडचणीची ठरु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या बैठकीला सर्व आमदारांनी हजर राहणं बंधनकारक आहे असा आदेश पक्षाकडून देण्यात आला होता. जवळपास 40 हून अधिक नाराज आमदारांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पदावरुन हटवावं अशी भूमिका घेत हायकमांडला पत्र लिहिलं होतं. त्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पंजाबच्या नेतृत्वात बदल करणार असल्याची चर्चा आधीपासून सुरु होती.

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. या वादात अमरिंदर सिंग यांना पायउतार व्हावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *