… तर सोलापूर जिल्ह्याचे एका महिन्यातच लसीकरण
… तर सोलापूर जिल्ह्याचे एका महिन्यातच लसीकरण
सोलापूर, दि.17 सप्टेंबर :
सोलापूर जिल्ह्याला मागील आठवड्यात दोन लाख लस मिळाल्या होत्या. शुक्रवारी पावणेदोन लाख लस मिळाल्या. मेगा लसीकरणामुळे आपणास जादा लस मिळत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ठ काम केले असून एका दिवसात तब्बल एक लाख 40 हजार लस देण्यात आल्या. कोरोनाचा पहिला डोस 13 लाख 90 हजार 662 नागरिकांना (38.9 टक्के) तर दुसरा डोस 4 लाख 79 हजार 578 नागरिकांना दिला आहे. जादा लस मिळाली तर सोलापूर जिल्ह्यात एका महिन्यात सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण होईल, असा विश्वास पालकमंत्री दत्ता भरणे यांनी व्यक्त केला.
नियोजन भवन येथे कोरोनाच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत भरणे बोलत होते. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्याला कोरोनाची मुबलक लस मिळत आहे. आणखी जादा लस मिळण्यासाठी प्रयत्नशील असून संबंधित यंत्रणेने लसीकरणावर भर देण्याच्या सूचना भरणे यांनी केल्या.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या कमी होत आहे, म्हणून कोणीही गाफील राहू नये. जिल्ह्यातील पाच तालुक्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रूग्णसंख्या कमी होण्यास मदत होत आहे. पॉजिटिव्ह दर 2.3 टक्के झाला आहे.सोलापूर शहरात रूग्णसंख्या कमी असली तरी गाफील न राहता कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनसाठी खूप कष्ट घ्यावे लागले. मात्र दुसऱ्या लाटेत आणि संभाव्यसाठी जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ठ तयारी केली आहे. पंढरपूर, करमाळा आणि माळशिरस तालुक्यातील ऑक्सिजन प्लान्ट नागरिकांच्या सेवेसाठी तयार झाले आहेत. यामुळे मुबलक ऑक्सिजन मिळू शकणार आहे. तरीही प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.
संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जिल्हा प्रशासन सज्ज आहे. बेडची क्षमता वाढविण्यात आली असून औषधसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. रूग्णसंख्या कमी होण्यास पाच तालुक्यात संचारबंदी लागू केल्याचा फायदा झाला. या तालुक्यात आता सहा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचनाही भरणे यांनी दिल्या.
