सहकार चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य नाही
सहकार चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य नाही
मुंबई, दि. 17 सप्टेंबर :
संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही. असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा आणि दोष दूर करण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषदेच्या आयोजनातून विचारमंथन घडवून आणावे अशी सूचनाही केली.
आपण बोलून दमून जावे एवढे भव्य काम एखादी व्यक्ती आयुष्यात करू शकते हे दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या कामातून दिसून येते. त्यांनी आयुष्य कमी पडेल एवढे भले मोठे काम सहकारात करून दाखवले असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राला उभे करण्याचे काम दिवंगत गुलाबरावांनी केले. त्यांचा राज्याला उभे करण्याचा विचारच क्रांतीकारक आहे. सहकार हे असे क्षेत्र आहे ज्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात समृद्धी आणता येते. त्यामुळे ही चळवळ अधिक चांगल्याप्रकारे पुढे नेताना जर सहकार क्षेत्रात चुका करून काही लोक ही चळवळ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा प्रवृत्तींना नाहीसे केले पाहिजे. सहकारात देखील बदल घडण्याची गरज असून सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी सरकार नक्कीच खंबीरपणे सहकार क्षेत्राच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
जन्मशताब्दी सोहळा समिती आयोजित व वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधानभवन यांच्या संयोजनाने सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या “प्रेरणोत्सव” कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जन्मशताब्दी सोहळा समितीचे कार्याध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कार्याध्यक्ष तथा राज्यमंत्री सर्वश्री विश्वजीत कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह विधानमंडळ सदस्य, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जीवनकार्यावरील चित्रफितीचे अनावरण झाले.
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, सहकार हा सिद्धांत आहे हे पटवून देण्याचे कार्य दिवंगत गुलाबराव पाटील यांनी केले. सहकाराचा इतिहास आणि २१ व्या शतकातील सहकारातील आव्हाने यांचे समीकरण जुळवून बदल घडवून आणणे आवश्यक आहे. सहकार कार्यकर्त्यांची नाविन्यपूर्ण चळवळ भविष्यात होणे गरजेचे आहे. गुलाबराव पाटील यांची कारकीर्द आणि त्यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा केवळ उल्लेख न करता त्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणे गरजेचे आहे.
