प्रत्येक शेतकऱ्याला लखपती करण्याचा प्रयत्न करा
प्रत्येक शेतकऱ्याला लखपती करण्याचा प्रयत्न करा
सोलापूर, दि.13 सप्टेंबर :
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण आणि कृषी या विभागाने समन्वयातून काम करावे. या विभागांनी प्रत्येक शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना मृद व जलसंधारण, रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी केली.
नियोजन भवन येथे रोहयो, जलसंधारण विभागाचा आढावा आणि ‘हर खेत को पाणी ‘ याबाबत आयोजित आढावा बैठकीत नंदकुमार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अधीक्षक अभियंता तथा प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप प्रक्षाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नंदकुमार यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात मका, सोयाबीन, तूर, मूग, ऊस आणि फळबागा ही पिके घेतली जात आहेत. यामुळे प्रत्येक विभागाने जास्त उत्पादन मिळणाऱ्या पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा विचार करावा . कोरडवाहू नाव हद्दपार करून प्रत्येक शेतकऱ्याला वर्षातून तीन पिके घेता यावी म्हणून प्रत्येकाच्या शेतीला पाणी देण्याचे सूक्ष्म नियोजन करा. जिथे पाऊस पडतो, तिथलं पाणी अडवण्याचा प्रयत्न करा, याबाबत शेतकऱ्यांना समजावून सांगा . १०० टक्के पाणी मुरण्याची व्यवस्था करून त्यातील ६० टक्के पाण्याचा वापर होईल, असेही नियोजन करा असेही ते म्हणाले.
पाटाने पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचनाद्वारे दिले तर एकरी ४० टक्के उत्पादन वाढत असल्याचे शेतकऱ्यांना पटवून द्या. यामुळे शेतकरी लखपती होण्यास मदत होणार आहे, असेही नंदकुमार यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रोहयोची कामे व्हावीत. कामे मागायला आल्यास त्वरित देता येण्यासाठी आणि मंजुरीची धावपळ टाळण्यासाठी प्रत्येक गावात पाच कामे सेल्फवर ठेवायला हवीत. पाणलोट विकास मानवाला धरून करायचा आहे. पाऊस आहे, पाणी आहे यामुळे प्रत्येक शेताला वर्षातून तीनदा पाणी देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
