लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसरा
लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसरा
सोलापूर जिल्ह्यात १६ लाख १४ हजार लोकांना लस मात्रा.
सोलापूर, दि.११ सप्टेंबर :
लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. जिल्ह्याला दोन लाख लसींचे डोस मिळाले असून शनिवारी एकाच दिवशी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर २ लाख लोकांना कोरोना लस देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी कोरोनामुक्त करण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन चांगले काम करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जलदगतीने अधिकाधिक लस मिळावी. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापूरसाठी अधिक लसींची उपलब्धता करून घेतली आहे.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली होती.लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून आजवर जिल्ह्यातील १६ लाख १४ हजार २० लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्यात सोलापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आजवर ५५ वेळा कोविशिल्डची लस १४ लाख २२ हजार ८४० तर २८ वेळा कोव्हॅक्सीनची ८२ हजार ६४० इतके डोस आले. यातून ८ ऑगस्टपर्यंत ११ लाख ७४ हजार ३१० जणांना पहिला तर ४ लाख ३९ हजार ७२० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण लसीकरण १६ लाख १४ हजार ३० इतके झाले आहे. लसीकरण सुरू झाल्यापासून एकाच दिवशी ७७ हजार ८४० इतके विक्रमी लसीकरण एकाच दिवसात झाले आहे. एका केंद्रावर जवळपास ८०० ते १२०० डोस देण्यात आले आहेत. यात ग्रामीणमध्ये ६५ हजार ७२१ तर ग्रामीण भागात १२०४९ इतके लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यात लसीकरणात टॉप असलेल्या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी न थकता काम केल्यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे भरणे यांनी सांगितले.
जुलै २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यासाठी लसीचा कमी साठा मिळत होता. सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हा मोठा आहे. सिरम इन्स्टिट्यूटसह विविध सामाजिक संस्था व संघटना पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींची उपलब्धता करून देत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी सतत संवाद साधून सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक लसीचे डोस उपलब्ध करून देण्याबाबत माझा पाठपुरावा सुरूच आहे. आगामी काळात निश्चितपणे लसीकरणात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येईल. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात आधी सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आहे असे पालकमंत्री म्हणाले.
