राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार
राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार
आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते जलपूजन
कोल्हापूर, दि.10 सप्टेंबर :
कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आजरा तालुक्यातील मौजे आर्दाळ येथे जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्यावतीने आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी खासदार संजय मंडलिक,आमदार प्रकाश आबीटकर,आमदार राजेश पाटील,आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार संजय घाटगे, पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील, अमोल नाईक, डी. डी. शिंदे, उपविभागीय अभियंता दिनेश खट्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्याची सोय होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पाचा लाभ घेऊन येथील शेतकरी या भागाचं सोनं करतील, असा विश्वास व्यक्त करुन या प्रकल्पासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.
जलसंपदा विभागाचे प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी, सर्पनाला, नागणवाडी, उचंगी व सोनुर्ले हे सर्व प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले असून यासाठी गतीने कार्यवाही केली जाईल असे जयंत पाटील यांनी सांगितले.
मेघोली धरण फुटल्यामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी चिंता करु नये, असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिले.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकल्पग्रस्तांच्या त्यागामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जलसंपदा विभागाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील वेळोवेळी बैठका घेऊन त्यासाठी पाठपुरावा करतात. यामुळे जलसंपदा विभागाचे राज्यातील सर्व प्रकल्प लवकरच मार्गी लागून शेतकऱ्यांची सोय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ३३.८४ चौरस किलोमीटर असून एकूण पाणीसाठा ३५.११ दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा ३२.६३ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पामुळे ३ हजार ९२५ हेक्टर क्षेत्र ( ६ हजार ३५९ हेक्टर सिंचन क्षमता ) सिंचनाखाली येणार आहे. धरणाची लांबी २२५० मिटर आहे. यामुळे आजरा व गडहिंग्लज या दोन तालुक्यातील २१ गावांना लाभ होणार आहे, असेही महेश सुर्वे यांनी सांगितले.
