संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज !
संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्ज
मुंबई, दि. 6 सप्टेंबर:
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यात साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनच्या साठा करण्याची क्षमता वाढवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मुख्य सचिवांनी सांगितले.
कुंटे पुढे म्हणाले की, गरज पडल्यास इतर राज्यांमधून ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी वाहतूकव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही बाहेरून ऑक्सिजन मागविण्याची वेळ येऊ नये यावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने निश्चित करून दिलेल्या उपचार मानकानुसार औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि हाफ़किनला सूचना दिल्या असून कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिन ३ लाखांवर गेली आहे, त्यात आरटीपीसीआर दोन लाख तर एक लाख ॲंटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्यांसठी ४१० शासकीय आणि २०२ खाजगी प्रयोगशाळा कार्यन्वित असून रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार रुग्ण खाटा वाढविण्यात आल्या आहेत. १ लाख २० हजार ऑक्सिजनयुक्त रुग्ण खाटा, ३६ हजार आयसीयू आणि १४ हजार व्हेंटिलेटर्स बेड्सची तयारी प्रशासनाने केली आहे.
राज्यात लसीकरणाची कामगिरी अतिशय उत्तम असून काल एकाच दिवशी १२ लाख लसींच्या मात्रा देऊन देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व उपस्थित फॅमिली डॉक्टरांनी आपल्या रुग्णांची तसेच नागरिकांची योग्य तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केले.
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. राज्यातील कोरोना रुग्णांची सुरूवातीची आणि सद्यस्थिती, दैनंदिन चाचण्यांची संख्या, रुग्णवाढीचा दर, लसीकरण, म्युकरमायकोसिस आदींची माहिती देऊन संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी क्षमतेचा वापर करून चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.
‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन परिषदेत डॉ. संजय ओक, , डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता यांनी कोविडच्या संदर्भात नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.
