दुधाला हमीभाव व अनुदान देण्यास काही मंत्र्यांचाच विरोध !
संगमनेर दि.२५ प्रतिनिधी
दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध आहे.हमीभावासाठी दूध उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्यांची दखल घेवून दूध संघानी आपल्या नफ्यातून दूध उत्पादकांना मदत करावी आणि सरकारने दूधाला १० रूपयांचे अनुदान तातडीने द्यावे आशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की युती सरकारच्या काळात जी मंडळी दुधाच्या अनुदानासाठी विधीमंडळाच्या पायर्यांवर बसून सरकारच्या विरोधात घोषणा देत होती आज तीच माणस सतेत आहेत.परंतू त्यांना आपल्याच घोषणांचा सोयीस्कर विसर पडला असल्याचा टोला लगावून आ.विखे म्हणाले की,दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेवून शेतकऱ्यांची मागील सरकारने पाच रुपयांचे अनुदान देवून यासाठी निधीची तरतूद केली.मग आताच्या सरकारला अडचण काय आहेॽ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दुध उत्पादकांना हमीभाव आणि अनुदान देण्यास या सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध असल्याचा आरोप त्यांनी केला. गेली अनेक वर्षे दूधसंघ चालविणारे आणि ,महानंदाची सता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी तरी अडचणीच्या काळात दूध उत्पादकांच्या पाठीशी उभे राहीले पाहीजे, आजपर्यत झालेल्या नफ्यातून दूधसंघानी उत्पादकांना मदत करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
शेतीच्या कारणाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आता दूधाला भाव मिळत नसल्याने उत्पादकांच्या सूरू झालेल्या आत्महत्या राज्याला शोभणार्या नाहीत.सरकारने अधिक वेळ न घालविता दुध उत्पादकांना १० रुपयांचे अनुदान द्यावे ही आमची मागणी कायम आहे.याबाबत निर्णय न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने १ आॅगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
आघाडी सरकार फक्त घोषणा करीत असून अंमलबजावणी शून्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच सरकार बांधावर खत देणार होते पण दुकानातच नाही बांधावर मिळणार कधीॽ शेतातील काम सोडून शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ आली. बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली.महाबीज कडून फसववणूक व्हावी हे आश्चर्यकारक आहे.दुबारपेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने सरकारने तातडीने मदत जाहीर करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
