भूजल व्यवस्थापनाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य

0
IMG-20210828-WA0019

भूजल व्यवस्थापनाने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य

पुणे, दि. 28 ऑगस्ट :
‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रा’च्या माध्यमातून राज्यासाठी भूजलाच्याबाबतीत एक दर्जेदार यंत्रणा उभी रहात आहे. या केंद्राच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील भूजलाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यामुळे विविध कारणांसाठी वाढलेली पाण्याच्या मागणीचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होईल. भूजल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रा’च्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या माहितीचा सुयोग्य आणि सक्षमतेनं वापर करण्याची गरज आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था काम करीत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मोठा कालावधी लागतो. पुढच्या पिढीचा विचार करता पाण्याचे योग्य नियोजन करुन वापर करणे ही काळाची गरज आहे. आपल्या राज्यासाठी भूजल उपलब्धता ही अतिशय महत्वाची बाब आहे, अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. ती आपल्याला जपली पाहिजे.

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ राज्यातील भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त करत या केंद्राचं काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन वेळेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुगर्भातील भूजल तपासणी करण्यासाठी भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याचे सुक्ष्म नियोजन करुन त्याचा योग्य वापर करणे काळाची गरज आहे. ‘हर घर जल, हर घर नल’ या योजनेच्या माध्ययातून राज्यात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रशासनाच्या मदतीने राज्य शासन काम करीत आहे. जलसंपत्ती सर्वात मोठी संपत्ती आहे. जलसंपत्ती वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संपूर्ण प्रकारे प्रयत्न करणार असल्याचेही पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहसंचालक डॉ. साळवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *