तिस-या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची भिती !
तिस-या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची भिती !
मुंबई, दि. 27 ऑगस्ट:
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख बाधित झाले आणि तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात १२ टक्के लोकांना ऑक्सिजन लागतो. गेल्या वेळी एका वेळी साडेसहा लाख ॲक्टिव्ह रुग्ण होते, आता १३ लाख ॲक्टिव्ह रुग्ण असतील, असा अंदाज व्यक्त होतो आहे, अंदाजित आकडेवारी आहे, त्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व तयारी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, तिसऱ्या लाटेच्या संदर्भात मंत्रीमंडळात चर्चा झाली, केरळच्या पार्श्वभूमीवर जिथे ओणम साजरा झाला तिथे मोठी गर्दी झाली त्याचा परिणाम जाणवतो. मी स्वतः केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी बोललो आहे, फोनवर बोललो ३१ हजार केसेस एका दिवशी आल्यात त्याची कारणं काय? आणि केरळपासून तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे समजायचे का? असे विचारले असता त्यांनी ओणम सणामुळे आणि दुसरे चाचण्यांची संख्या वाढविली आहे त्यामुळे संख्या वाढली आहे.
तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी राज्याने पूर्ण तयारी केली आहे. जून महिन्यात केंद्र शासनाने जे सांगितले की जून महिन्यात तिसरी लाट येऊ शकेल त्याची संख्या ६० लाख लोक बाधित होऊ शकतील, आणि त्याच्या टक्केवारीत १२ टक्के ऑक्सिजन बेड लागतील, मात्र दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता ही जी आकडेवारी आहे त्याला धरून तयारी करीत आहोत
आरोग्य विभागातील १०० टक्के रिक्त जागा भरतो आहे. २५ आणि २६ ला वर्ग क आणि ड वर्गाच्या भरती परीक्षा घेत आहोत. १२०० डॉक्टर्स घेत आहोत, ५ सप्टेंबरच्या अगोदर त्यांचे समुपदेशन होऊन त्यांना आदेश दिल्या जातील. सुपर क्लास वन यांना एमपीएससीकडून भरतो आहे. अ, ब, क, ड वर्ग रिक्त पदे भरतो आहे. ऑक्सिजन १२०० ते १३०० मेट्रिक टन पूर्वी उपलब्धता असायचा आता २००० मेट्रिक टन पर्यंत वाढवली आहे. जुलैच्या अधिवेशनात आर्थिक तरतूद करून घेतली आहे, औषधे, आवश्यक उपकरणे घेतली जातील. एक हजार रुग्णवाहिका खरेदी केल्या, ५०० रुग्णवाहिका दिल्या आहेत तर उर्वरित ५०० सप्टेंबर अखेर प्रत्येक आरोग्य केंद्रांपर्यंत त्या जाणार आहेत. महाराष्ट्रात १०० टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, जिल्हा रुग्णालयांना रुग्णवाहिका मिळतील.
एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या वतीने जो प्रस्ताव पाठवला आहे, ५ हजार कोटींचा, त्यात आपल्या आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी कर्ज घेण्याचा विषय आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जे आकडे सांगितले जात आहेत, त्यांना धरूनच आपण सर्वतोपरी काळजी घेत आहोत.
