‘त्यांना’ हिंदूंचे नाव घेण्याचा हक्क नाही !
‘त्यांना’ हिंदूंचे नाव घेण्याचा हक्क नाही !
नांदेड, दि. 25 ऑगस्ट
कोरोना काळात हिंदूंची शेकडो प्रेते गंगा नदीपात्रात वाहत होती. जे लोक हिंदुचे नाव घेऊन मतं मागून सत्तेत आले त्यांच्याच राज्यात हिंदूंच्या प्रेतांची अवहेलना होते अशा लोकांना हिंदूंचे नाव घेण्याचा हक्क नाही असा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्या देशातील परिस्थिती वेगळी आहे, सरकारच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो, ईडीची कारवाई केली जाते. ईडीचे नाव याआधी कधी फारसे चर्चेत नव्हते पण मागील काही वर्षात ईडी हे जास्त चर्चेत आले आहे. सध्या लोकशाही व राज्यघटनेला धोका आहे तो ओळखला पाहिजे. देशातील शेतकरी १० महिन्यापासून आंदोलन करत आहे त्याची साधी दखलसुद्धा केंद्रातील सरकार घेत नाही.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सुरु असलेले ‘व्यर्थ न हो बलिदान’ चलो बचाये संविधान’, अभियान निमित्त नांदेड येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ज्या लोकांचा स्वातंत्र्य चळवळीत कधीच सहभाग नव्हता त्यांनी धर्माच्या नावाखाली देश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जे देश धर्माच्या नावावर उभे राहिले तेथे लोकशाही नांदू शकली नाही. भारतही धर्माच्या नावावर उभा राहिला असता तर आपल्या देशातली आजची परिस्थिती वेगळी असती. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने लोकशाही व्यवस्था देशात निर्माण झाली म्हणून आपण आज हा दिवस पाहत आहोत. हे स्वातंत्र्य फक्त काँग्रेसच वाचवू शकते आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. देशाच्या एकात्मतेला बाधा पोहचवणाऱ्यांविरोधात काँग्रेस उभा राहिल. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम काँग्रेसने केले आहे. चुकीच्या लोकांच्या हातात देश गेला तर काय होते ते आज पहात आहोत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. लोकांनी भाजपाला भरघोस मतदान करुन सत्ता दिली पण सत्तेत येताच भाजपाने तो निवडणूक जुमला होता असे म्हटले. तर दुसरीकडे मात्र हेच मोदी सरकार उद्योगपतींची कर्जमाफ करत आहेत. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, यांनी भाजपच्या विभाजनवादी राजकारणावर सडकून टीका केली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे व चंद्रकांत हंडोरे, माजीमंत्री डी. पी. सावंत, नांदेड शहर अध्यक्ष आमदार अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश सरचिटणीस व ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचे समन्वयक विनायक देशमुख व अभय छाजेड, नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेली आदी उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. नांदेडमधील कार्यक्रमाला लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या चार जिल्ह्याचे पदाधिकारीही उपस्थित होते.
