गोडसेच्या विचाराचे गुणगान देशासाठी घातक !
गोडसेच्या विचाराचे गुणगान देशासाठी घातक !
मुंबई, नांदेड, दि. 25 ऑगस्ट
काँग्रेसचा अजेंडा हा विकासाचा, देशाचे संविधान वाचवण्याचा आहे परंतु संविधान व देशाचा इतिहास बदलण्याचे काम केले जात आहे त्या शक्तीचा बिमोड आपल्याला करायचा आहे. अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेच्या विचाराचे गुणगान काही लोक गात आहेत हे देशासाठी घातक आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने सुरु असलेले ‘व्यर्थ न हो बलिदान’ चलो बचाये संविधान’, अभियान निमित्त नांदेड येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
चव्हाण पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात मोठी स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली, त्यातूनच पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाची, बलिदानाची आठवण करण्याची ही वेळ आहे. या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. अमृत महोत्सवी वर्षात हे वैभव जतन करायचे आहे. हे वैभव पुसून टाकण्याचे काम कोण करत असेल तर ते थोपवले पाहिजे.
देशात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणली आहे. देशाच्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचे काम, लोकशाहीच्या तत्वांना तिलांजली देण्याचे काम सुरु आहे. देशाच्या स्वातंत्र्यात भाग घेतलेला एकही नेता भाजपाकडे नाही, त्यांच्याकडे इतिहास नाही. वल्लभभाई पटेलांचा उंच पुतळा उभारून चालणार नाही त्यांच्या विचारांची उंची गाठता आली पाहिजे असेही चव्हाण म्हणाले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे व चंद्रकांत हंडोरे, माजीमंत्री डी. पी. सावंत, नांदेड शहर अध्यक्ष आमदार अमर राजूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, संपतकुमार, प्रदेश सरचिटणीस व ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचे समन्वयक विनायक देशमुख व अभय छाजेड, नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेली आदी उपस्थित होते.
