जत तालुक्यातील पाणी प्रश्नासोबत इतर प्रश्नही मार्गी लावू
जत तालुक्यातील पाणी प्रश्नासोबत इतर प्रश्नही मार्गी लावू
सांगली, दि 23 ऑगस्ट :
जत तालुका पाण्यापासून वंचित राहिला होता त्यामुळे जत तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख झाली होती पण आता म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी जतच्या शिवारात पोहचले आहे. तालुक्यातील 65 गावे पाण्यापासून वंचित होती त्यासाठी 6 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले आहे. हे पाणी प्रत्यक्ष 65 गावातील शेतकऱ्यांच्या शिवारात जाण्यासाठी योजना तयार करून त्याची राज्य शासनाकडून मंजुरी घेतली जाईल व ही कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. तसेच जत तालुक्यातील इतर प्रश्नही मार्गी लावू अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
आवंढी तालुका जत येथील मागासवर्गीय समाज वस्तीतील विकासकामांचे व आवंढी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्याचा पाणी प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता हे सर्व पाणी प्रश्न जलसंपदा मंत्री म्हणून तातडीने मार्गी लावण्यात आले आहेत. पाणीप्रश्नाव्यतिरिक्तही जतच्या नागरिकांचे इतर प्रश्नही येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होणारी ठिकाणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, आवंढी गावात नूतन ग्रामपंचायतीच्या उभारण्यासाठी 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता त्यातूनच ही सुसज्ज इमारत उभी झाली आहे. गावच्या शेतीचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी सुमारे 1.5 किलोमीटरच्या पाईपलाईनचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे आता मानेवाडी रस्त्याचे कामही तातडीने मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी आमदार अमोल मिटकरी म्हणाले राज्यातील खेडी सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. खेडी सक्षम झाली की राज्य सक्षम होईल. त्यानुसार आवंढी गावासाठी सभामंडप उभारणी व हायमॅक्स दिव्यांसाठी 20 लाखांचा निधी आमदार फंडातून देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
