विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया

0
FB_IMG_1629714751309

विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया

नाशिक, दिनांक 23 ऑगस्ट :
अनेक आपत्तीचा सामना करत शासन आपल्यास्तरावर विविध विकासांची काम करीत असते. कोरोनासारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळातही विकास कामे सुरू ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करीत आहोत. अशा परिस्थीतीतही न थाबंता विकासकामे या पुढेही नियमित सुरू राहतील, असे प्रतिपादन अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील ब्राम्हणगांव विंचूर व मुखेड येथे एकूण 1 कोटी 92 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे विकास कामे काही काळ थांबली होती. परंतू आता पुन्हा एकदा विकासाची कामे सुरू झाली असून रखडलेली सर्व कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या विकास कामासाठी लागणारा आवश्यक निधी शासनस्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोळागाव पाणी पुरवठा योजनेबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यात येवून, हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच शिवनदी स्वच्छतेबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून हा प्रश्न देखील मार्गी लागेल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. नाशिक जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पाच पट ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी प्रथमतः नागरिकांचे जीव वाचविण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी व कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करून प्रत्येकाने आपले कुटुंब सुरक्षित राहील याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *