लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा
औरंगाबाद, दि 23 ऑगस्ट :
कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी शासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. यासह प्रत्येक पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नागरिकांना केले.
बजाज समूह आणि जिल्हा प्रशासनात मोफत कोविड लसबाबत सामंजस्य करार लासूर स्टेशन येथे पांडव लॉन्स याठिकाणी झाला यावेळी डॉ.कराड बोलत होते.
डॉ. कराड यांनी सामाजिक जबाबदारीतून अनेक उल्लेखनीय कार्य बजाज समूह करत असते. बजाज समुहाने कोविड काळात शासनाला भरीव प्रमाणात मदत केली. कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राज्याला सहा लक्ष कोविड लस मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, ही कौतुकाची बाब आहे. कोरोना आजारापासून धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. जगभरातील कोविड लसीकरणाचा विचार केल्यास सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविल्या जात असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.
जिल्ह्यात जवळपास 33 लक्ष नागरिकांना कोविड लसीकरण करावयाचे आहे. त्यापैकी 30 टक्के नागरिकांना लसीकरण झालेले आहे. गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात लसीकरण करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.
बजाज समुहाने जिल्ह्यासाठी दोन लक्ष 30 हजार मोफत लस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे प्रशासनाच्यावतीने आभारही मानले. यापूर्वी पंढरपूरमध्येही बजाज समुहाच्यावतीने लसीकरण शिबिर पार पडले. कोरोना विषाणूपासून बचावासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई सातत्याने नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्यासाठी आवाहन करत आहेत. त्यानुसार प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत, सोशल डिस्टंसिंगचे अंतर पाळावे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.
