पुणे जिल्ह्यात ७० लाख कोविड लसीकरणाचा टप्पा पार

0
20210816_195754

पुणे जिल्ह्यात ७० लाख कोविड लसीकरणाचा टप्पा पार.

टास्क फोर्स तज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबतचा निर्णय.

पुणे, दि. २० ऑगस्ट :
जिल्ह्यात कोवीड प्रतिबंधक लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. ग्रामीण भागात धडक सर्वेक्षण मोहिमेंतर्गत २ लाख ८३ हजार ३२७ नमुना तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट गावांमध्ये कोविडबाबत योग्य वर्तन जनजागृती, शोध चाचणी उपचार, कोविड केअर सेंटर, शासकीय योजना व कोविड लसीकरण या पाच कृतीदलाच्या माध्यमातून कोविडमुक्त गाव अभियानास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकंमत्री अजित पवार यांनी दिली, तसेच टास्क फोर्सच्या मार्गदर्शनानुसारच शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विधान भवनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात मागील चार आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासन तयारी करत असून नागरिकांनीही नियमांचे पालन करावे. पुणे मनपामध्ये १०, पिंपरी चिंचवडमध्ये ३, पुणे ग्रामीण मध्ये १२ ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित झाले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अपेक्षीत ऑक्सिजनची गरज लक्षात घेता  जिल्हा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग समाधानकारक आहे. जवळपास कोवीड लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. खाजगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचे नियंत्रण आहे. तसेच खाजगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही.

सुपर स्प्रेडर सर्वेक्षण नमुना तपासणीमध्ये एम.आय.डी.सी. कारखाने क्षेत्रातील कामगार व मजूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आरटीपीसीआर नमुना तपासणी करण्यात येत आहे. धडक सर्वेक्षण मोहिमेमुळे हॉटस्पॉट गावांची संख्या १०९ वरुन ९५ पर्यंत कमी झाली आहे.  ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचे तज्ञ जे मार्गदर्शन देतील त्यानुसारच निर्णय घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *