महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी इतरत्र कुठेही नाही

0
IMG_20210715_193758

महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी इतरत्र कुठेही नाही

मुंबई, दि. 17 ऑगस्ट:
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून पर्यटन बंद असले तरी या क्षेत्राला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध धोरणे आणि निर्णय या काळात घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत, यासारखी पर्यटन समृद्धी अन्यत्र कुठे आढळून येत नाहीत असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण मंजुर करण्यात आले आहे. आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी याला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल सुरु करण्यासाठी आता अनेकांकडून विचारणा होत आहे. राजशिष्टाचार विभागामार्फत नुकतीच मुंबईतील विविध देशांचे महावाणिज्यदूतांसमवेत बैठक संपन्न झाली, त्यांनीही महाराष्ट्राचा पर्यटनवारसा समृद्ध असल्याचे सांगितले. आता आज सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमे आणि सामंजस्य करारातून या क्षेत्राला अधिक व्यापक करण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यासह कोकणाच्या पर्यटन विकासासाठी शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी आजही काही उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याबाबत नेहमी बोलत असतो. पण कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहीजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करु. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन क्षेत्राला आज सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरुवातीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी प्रास्ताविक करुन पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तसेच एमटीडीसीमार्फत आज सुरु करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *