‘शहाण्याला शब्दांचा मार’!
‘शहाण्याला शब्दांचा मार’!
आमदार नियुक्तीवरून पवारांचा राज्यपालांना टोमणा
मुंबई, दि. १७ ऑगस्ट:
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा अजून सुटलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही राज्यपालांच्या निर्णय न घेण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करून आठ महिने हा काळ निर्णय घेण्यासाठी फार मोठा आहे असेही म्हटले होते. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र अद्याप या १२ आमदारांच्या नियुक्तीवर कोणताच निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावर राज्यपालांना खास शैलीत टोमणा मारला आहे.
आमदार नियुक्तीच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज्यपालांचे एक स्टेटमेंट पाहिले की, सरकारने १२ आमदारांबाबत संपर्क केला नाही पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व नवाब मलिक यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे त्यांच्या वयानुसार त्यांचे वक्तव्य आहे असे बोलतानाच ‘शहाण्याला शब्दांचा मार’ अशी आपल्याकडे म्हण आहे असा टोमणा मारत ‘शहाण्याला’ या शब्दावर जोर दिला. १२ आमदारांच्या विषयाबाबत आम्ही आता प्रतिक्रिया देण्याचेही टाळत आहोत असेही पवार म्हणाले.
राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा चांगलाच तापला असून राजभवन व राज्य सरकार यांच्यातील संबंध चांगले नसल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादंग झाले आहे. उच्च न्यायालयाने आमदारांच्या मुद्द्यावर टिप्पणी केल्यानंतर राज्यपाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटले त्यामुळे हा मुद्दा निकाली निघेल अशी आशा निर्माण झाली आहे.
