सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील

0
FB_IMG_1629039133772

सोलापूर जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील

सोलापूर, दि. 15 ऑगस्ट :
जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. नागरिकांनी कोरोनाची काळजी करण्यापेक्षा काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. भरणे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे यश येईल. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून भरीव निधीची तरतूद केली असून राज्य स्तरावरुनही भरघोस निधी दिला जाईल.

जिल्ह्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे बळकटीकरण करण्यावर भर दिला आहे. खास महिला आणि मुलांसाठीच्या स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी लवकरच पूर्ण होईल. साथरोग नियंत्रण रुग्णालय सुरु केले जाणार असून उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनुष्यबळ आणि औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीखालील क्षेत्र वाढले आहे. ही बाब अतिशय समाधानाची आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री विमा योजनेस चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात फळ पिके चांगल्या प्रकारे होत आहेत. या पिकांचे व्यापारी तत्वावर उत्पादन व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर सल्ला केंद्र देखील स्थापन करण्यात येत आहेत. किसान रेल्वेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बळीराजाचा शेतमाल मोठ्या शहरात पोहोचू लागला आहे, यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत आहे, ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 16 लाख वृक्षारोपण…

जिल्ह्यात वनाचे क्षेत्र वाढण्यासाठी माझे रोप, माझी जबाबदारी अभियानातून जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यावर भर देण्यात येत आहे. वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात यंदा सुमारे 16 लाख वृक्षारोपण केले जात आहे. वृक्ष लागवडीच्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सोलापूर शहराला मुबलक आणि रोज पाणीपुरवठा होण्यासाठी दुहेरी पाईपलाईनचे काम वेगाने सुरू आहे. राज्य शासनाने या प्रकल्पांस प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका व्यापक प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग आणि मृत्यूचा दर कमी करण्यात यश आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही याचप्रमाणे लवकरच यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून बेडची उपलब्धता, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *