दलित, गरीब, शेतक-यांचा आक्रोशच मोदींना हुसकावून लावेल

0
IMG_20210812_220551

दलित, गरीब, शेतक-यांचा आक्रोशच मोदींना हुसकावून लावेल

नवी दिल्ली, दि. 12 ऑगस्ट:
देशातील गरिब, दलित, शेतकरी, मजूर यांचा आक्रोश एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पंतप्रधान पदावरून हुसकावून लावेल, असा खणखणीत इशारा काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी जंतरमंतरवर बोलताना दिला.

अ. भा. काँग्रेसच्या अनूसूचित जाती विभागाचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित हल्लाबोल आंदोलनाला संबोधित करताना राहूल गांधी बोलत होते.

भित्र्या लोकांशी लढताना घाबरू नका, भारतीय कोणत्याही शक्तीपुढे घाबरत नाही, हे लक्षात ठेवा,अशा शब्दात त्यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना संघ परिवार व मोदी सरकारविरूद्ध लढण्याचे आवाहन केले.
देशभरात दलितांवर वाढत असलेले अत्याचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्यांविरूद्ध केंद्रातील मोदी सरकारला व विविध राज्यातील भाजप सरकारांना जाब विचारण्यासाठी डॉ. राऊत यांच्या पुढाकाराने नवी दिल्लीत हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या आंदोलनात देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते के वेणुगोपाळ, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, के. एच. मुनियप्पा, सुश्मिता देव, अनिल चौधरी आणि काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, ‘मी प्रत्येक बैठकीत माध्यमांबद्दल बोलतो. माध्यमे आमचे मित्र आहेत. मात्र आमचे हे मित्र देशाचे काम करीत नाहीत. ते केवळ दोन-तीन उद्योगपती, नरेंद्र मोदी आणि आर.एस.एस. चे काम करीत आहेत. मात्र या देशातील जनता खूप समजूतदार आहे, त्यांना हळूहळू सर्व लक्षात येत आहे. हळूहळू देशात, गरिबांच्यामधून, दलितांमधून, शेतक-यांमधून तुम्हाला एक आवाज ऐकायला येईल. हा आवाज हळूहळू वाढत जाईल आणि एक दिवस हा आवाज वादळाचे रूप धारण करेल आणि हे वादळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरातून हाकलून देईल.

राज्यघटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला निर्भय बनण्याच्या दिलेल्या शिकवणुकीची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वांना आठवण करून दिली. स्वातंत्र्यापूर्वी दलितांना आपल्या देशात काळोखात ठेवले गेले. त्यांना त्या काळोखातून बाहेर येऊ दिले जात नसे, त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात होते. घटनेच्या निर्मितीनंतर दलितांना त्यांचे हक्क, अधिकार मिळाले. फक्त काँग्रेस पक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्र येऊन देशातील प्रत्येक नागरिकाला विशेषतः दलित नागरिकांना त्यांचे हक्क, अधिकार बहाल केले. आज त्याच संविधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे काही चार-पाच उद्योगपती मित्र आक्रमण करत आहेत. आपण जिथे बघाल तिथे संविधानावर हल्ला केला जात आहे. संसदेत शेतकऱ्यांचे, दलितांचे आणि मागासवर्गीयांचे, महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यास बोलू दिलं जात नाही,” अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *