बाहेरच्या लोकांना राज्यसभेत आणून महिला खासदारांना मारहाण
बाहेरच्या लोकांना राज्यसभेत आणून महिला खासदारांना मारहाण
नवी दिल्ली, दि. १२ ऑगस्ट :
राज्यसभेत झालेल्या गोंधळावर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी विजय चौकात आंदोलन करून मोदी सरकारवर तोफ डागली. बाहेरून लोकांना बोलावून आणून महिला खासदारांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही पेगॅसस, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, पण संसदेत बोलण्याची परवानगी नव्हती.आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे यावे लागले कारण आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे. देशातील ६० टक्के लोकांचा आवाज काल दाबला गेला. त्यांना अपमानित करण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ला केला गेला.
बुधवारी राज्यसभेत विरोधी पक्षाचे खासदार आणि मार्शल यांच्यात हाणामारी झाली.काँग्रेसच्या राज्यसभेच्या काही महिला खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये विरोध करत असताना त्यांना मार्शलनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.
