आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे निधन
पुणे, दि. १० ऑगस्ट :
योगगुरू व आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनात साडेतीन दशकांपासून अधिक काळ डॉ. बालाजी तांबे कार्यरत होते. सोप्या भाषेत त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत.
बालाजी तांबे यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली…
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचे पुनर्जीवन केले. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्वं घराघरात पोहचवलं.
स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. बालाजी तांबे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुष्यभर आयुर्वेद व योग शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. देशातच नाही तर परदेशातही त्यांनी आयुर्वेद व योगाचे महत्व पटवून देत विविध समाज घटकांना आयुर्वेदाशी जोडले. त्यांच्या निधनाने अध्यात्म, योग शिक्षण व आयुर्वेदातील व्रतस्थ कर्मयोगी हरपला, अशी शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. माझा त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि अध्यात्म यावर अतिशय विपुल लेखन केले आणि विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. विशेषत: स्त्रियांच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे काम केले. योग, संगीतोपचार असे विविध प्रयोग त्यांनी केले. त्यांचे माध्यमांतील लेख वा मुलाखती या विचारप्रवर्तक असायच्या आणि म्हणूनच त्या लोकप्रिय ठरल्या. श्रोत्याला त्या मानसिक समाधान-आधार देणार्या असायच्या. मी बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत, अशी श्रद्धांजली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्पण केली.
