पंढरपूरसह पाच तालुक्यातील परिस्थिती गंभीर!
पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत चर्चेअंती निर्णय.
सोलापूर, दि. 7 ऑगस्ट :
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच तालुक्यातील कडक निर्बंधाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत भरणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.
भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात रूग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. पॉजिटिव्ह दर 3.6 टक्के झाला आहे. मात्र प्रशासनाने रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. नागरिकांनी काळजी घ्यावी. पाच तालुक्यातील संसर्ग इतर तालुक्यात पसरून फटका बसू नये, यासाठी तिथे कडक निर्बंध आणावे लागणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून आणि सर्वांना विश्वासात घेऊ प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
म्युकरमायकोसिसचे रूग्ण कमी होत आहेत. केवळ 28 रूग्ण उपचार घेत आहेत, मात्र सतर्कता बाळगा. लहान बालके, कोमॉर्बिड रूग्णांवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचनाही भरणे यांनी दिल्या.
लसीकरणाबाबत जिल्हा मागे राहता कामा नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या.
सोलापूर शहरात रूग्णसंख्या कमी होत आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. शहरातील व्यापारी संघटनांची मागणी, दुकानदार यांचा विचार केला जाणार आहे. रूग्णसंख्येनुसार शहरातील निर्बंधाबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करून शिथीलतेचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही भरणे यांनी दिली.
