गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कार्यालय पुणे व परळीत!

0
IMG_20210702_083803

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे कार्यालय पुणे व परळीत!

ऊसतोड कामगार नोंदणी, अधिकारी,कर्मचारी नेमणूक तातडीने पूर्ण करा.

मुंबई दि. 5 ऑगस्ट :
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामास गती आली असून, महामंडळाचे कार्यालय तातडीने सुरू करावे असे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत आदेश देऊन तलाठी व ग्रामसेवक यांच्याकरवी सुरू करावी तसेच ती माहिती साखर कारखाने यांच्याकडूनही उपलब्ध करावी असे निर्देशही धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला गती देऊन संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात आज धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, यासह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे व परळी येथे महामंडळाचे कार्यालय सुरू करावे, त्यासाठी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करावी तसेच कार्यालयात लागणारे अन्य कर्मचारी तातडीने उपलब्ध करून घ्यावेत असेही यावेळी धनंजय मुंडे यांनी निर्देशित केले आहे.

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आलेल्या २० वसतिगृहांसाठी इमारती उपलब्ध करण्यासाठी संबंधित जिल्हा स्तरावर जाहिराती प्रसिद्ध करून इमारती उपलब्ध करून घ्याव्यात तसेच प्रति वसतिगृह १०० विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक अन्य सामग्री खरेदी करावी असेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले.

वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या मुलांना नामांकित शाळा-महाविद्यालय येथे प्रवेश मिळावा यासाठी देखील मदत करण्यात येणार आहे.

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास भागभांडवल खर्चासाठी नुकताच मंजूर केलेला निधी महामंडळाच्या लेखाशीर्षात वर्ग करून वरील कामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातंर्गत शरद आरोग्य वाहिनी, ऊसतोड कामगार अपघात विमा योजना आदी काही कल्याणकारी योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा प्रस्ताव पूर्ण करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे लवकर पाठवण्यात यावा असेही धनंजय मुंडे म्हणाले.

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या रचनेमध्ये संचालक मंडळ, तसेच आवश्यकतेनुसार कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असून, संचालक मंडळात धनंजय मुंडे, राज्यमंत्री विश्वजित कदम, समाजकल्याण आयुक्त, साखर आयुक्त, कामगार आयुक्त हे पदसिद्ध सदस्य असतील तसेच ऊसतोड कामगारांच्या काही प्रतिनिधींची देखील यामध्ये नियुक्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *