‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’च्या प्रसारणावर बंदी आणा!

0
Anil-Deshmukh

मुंबई, दि.१५ जुलै २०२०

‘महंमद द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाचे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारण २१ जुलै रोजी करण्यात येणार आहे,  परंतु त्यावर बंदी घालावी असे विनंतीपत्र रजा अकादमीने राज्याच्या सायबर विभागास पाठविले होते. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदीनुसार चित्रपट प्रसारणावर बंदी घालावी, असे पत्र केंद्र शासनास पाठविले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाला पत्र पाठवून या चित्रपटाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रसारणावर बंदी घालावी तसेच यु ट्यूब, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सला सदर चित्रपट प्रसारित न करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी पत्रात केली आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाने देखील अशा प्रकारची विनंती सदर मंत्रालयाला केली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता हे बंदी घालण्यासाठीचे विनंतीपत्र दिले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *