पॅकेज म्हणा की आणखी काही पण मदत जाहीर करा
पॅकेज म्हणा की आणखी काही पण मदत जाहीर करा !
पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली भागात फडणवीसांचा दौरा
कोल्हापूर, ३१ जुलै :
सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील शेती आणि पिकांचे नुकसान मोठे आहे. अनेक घरात चिखल आहे, घरात साधे मीठ सुद्धा नाही त्यामुळे तातडीची मदत ही महत्वाची असते परंतु अजूनही मदत आलेली नाही. पॅकेज म्हणा की आणखी काही पण लोकांना मदत जाहीर करा, अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, या पूरग्रस्त भागातील २२ ठीकाणांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. सध्या तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारने त्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत. २०१९ च्या पुरावेळी रेशनकार्ड नसताना, कोणतेही कागद न मागता आमच्या सरकारने मोठी मदत केली. या सरकारने अजून तरी कोणतीही मदत केलेली नाही. आमची अपेक्षा आहे की ती लवकर देण्यात यावी. आमच्या काळात तीनपट नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती. समित्या अनेक तयार होतात पण त्याच्या अहवालांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सुद्धा गरज आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवर आम्ही काम केले. जागतिक बँकेने त्यासाठी कर्ज मंजूर केले. यातून दुष्काळी भागाचा प्रश्न मिटेल, पुराचेही प्रश्न मिटतील. यासाठी एका बैठकीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यासंदर्भात सविस्तर निवेदन देणार आहे आणि मुख्यमंत्री बोलवतील तेव्हा बैठकीला जाऊ.

कोल्हापूरचा बास्केट ब्रिजच्या बाबतीत दिरंगाई होत आहे. हे काम लवकर झाल्यास दळणवळणाचा प्रश्न राहणार नाही. २२ पुलांचा एक आराखडा सुद्धा तयार केला होता त्याची अंमलबजावणी व्हावी. सवलतीचे कर्ज दिले पाहिजे अशी मागणी अनेक घटकांनी केली आहे याचाही विचार राज्य सरकारने केला पाहिजे. यावेळी राधानगरी किंवा अलमट्टी विसर्गाचा प्रश्न नसताना आणि पाऊस फार नसतानासुद्धा ही आपत्ती आली, त्यामुळे या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दुष्काळी भागात पाणी वळविणे हा उपाय आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये जागतिक बँकेने यासाठी अर्थसहाय्य मंजूर केले आहे. पण सरकारने यावर कोणतीही पुढची कार्यवाही केलेली नाही.
कोल्हापूरच्या दौऱ्यात फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, राजे समरजित सिंह घाटगे, राहुल चिकोळे, अमल महाडिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
